वाशीम । पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री संजय राठोड(Minister Sanjay Rathod) यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात घाणेरडे राजकारण करण्यात आले. मी मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त आणि ओबीसी समाजाचा नेता आहे. या आरोपांच्या माध्यमातून माझं राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी केले. (Sanjay Rathod press conference in Poharadevi) ते मंगळवारी पोहरादेवी येथे आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले.
यावेळी पत्रकार परिषदेत संजय राठोड म्हणाले की, बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूचा बंजारा समाजाला दु:खं झालंय, मात्र या प्रकरणावरून जे घाणेरडे राजकारण केले जातंय, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे, मी मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी, भटक्या कुटुंबातून येऊन नेतृत्व करतो त्यामुळे माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे, या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं त्यांनी सांगितले.
तसेच मागील १५ दिवसांपासून माझं काम सुरूच होतं, माझ्याबद्दल टीव्हीवरचं प्रेम पाहत होतो, या दिवसात शासकीय काम मुंबईच्या बंगल्यातून सुरू होतं, माझ्या कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना धीर देत होतो, त्यांना सांभाळण्याचं काम केलं, आज या पवित्र भूमीत येऊन पुन्हा मी माझ्या कामाला सुरूवात करणार आहे. पोलीस चौकशी सुरू आहे, या तपासातून सत्य बाहेर येईल, अरूण राठोड कोण मला माहिती नाही, सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत, माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात, सर्वांना सोबत घेऊन मी काम केलं आहे, एका घटनेने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.