कोरोनामुळं मोहरमला मातम मिरवणुकीला परवानगी नाही, शासनाकडून नियमावली जाहीर

मुंबई । रमजान ईद, दहीहंडी उत्सव, बकरी ईद, गणेश उत्सवाप्रमाणे शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोहरमसाठी ही नियमावली जाहीर केली आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता इतर सण, उत्सव, कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं यंदा धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मोहरमसाठी शासनाने जाहीर केलेली नियमावली खालीलप्रमाणे-
1) मातम मिरवणूक- कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम देखील आपापल्या घरात राहून दुखवटा पाळण्यात यावा, केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये.

2) वाझ/मजलीस- हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे.

3) ताजिया/आलम- ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया/आलम घरीच/घराशेजारी बसवून तेथेच शांत/ विसर्जन करण्यात यावेत.

4) सबील/छबील- सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी २ पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात यावे.

5) कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही.

6) कोविड- 19च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, प्लाज्मा शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असं जारी केलेल्या नियमावलीत म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook