धक्कादायक! मागील २४ तासांत राज्यातील ३०३ पोलीस कोरोनाबाधित तर ५ पोलिसांचा मृत्यू

मुंबई । राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ३०३ पोलीस करोनाबाधित आढळले असून, ५ पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १३ हजार १८० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३८९ जण, कोरोनामुक्त झालेले १० हजार ६५५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १३६ जणांचा समावेश आहे. राज्यातील १३ हजार १८० कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ३८७ अधिकारी व ११ हजार ७९३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (ऍक्टिव्ह)२ हजार ३८९ पोलिसांमध्ये ३१३ अधिकारी व २ हजार ७६ कर्मचारी आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या १० हजार ६५५ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६० व ९ हजार ५९५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३६ पोलिसांमध्ये १४ अधिकारी व १२२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या २ दिवसांत मुंबईत चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस दलातील साडे ३ हजार अधिकारी, अंमलदार कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यापैकी सुमारे ३ हजार करोनामुक्त झाले, मात्र ६१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”