मुंबई । महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाचे २६८.९६ कोटी रूपयांची थकबाकी रक्कम तात्काळ देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त झी२४ तास या वृत्तवाहिनीने दिलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने परराज्यातील मजुरांना परराज्याच्या सीमेवर पोहचविले. यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. यासाठी शासनातर्फे सर्व खर्च देण्यात येणार होता. परंतु मजुरांनाच्या मोफत प्रवासाचे पैसे मदत व पुर्नवसन खात्याकडून ९४ कोटी ९६ लाख इतकी रक्कम एस.टी. महामंडळाला मिळाली नाही आहे. तसेच पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणूक याकरीता एस.टी. बसच्या खर्चापोटी शासनाकडे १४७ कोटी रुपये थकीत आहेत. याशिवाय विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी २७ कोटी रूपये येणे असल्याचे इंटकतर्फे सांगण्यात आले.
कोरोना काळात एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊनच्या काळात २५०० कोटीहून अधिक नुकसान झालंय. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही रक्कम उपलब्ध नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वेतनासाठी ५०० कोटी रुपये अर्थसहाय्य दयावे. तसेच मजुर प्रवास, पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणूक, विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी परतावा असे एकूण २६८.९६ कोटी तात्काळ एस.टी. महामंडळास दयावेत अशी मागणी करण्यात आलीयं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”