हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने जोरदार रणनीती आखली आहे. त्यानुसार, एप्रिल आणि मी महिन्यात महाविकास आघाडी संपूर्ण राज्यभर संयुक्त सभा घेणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले हे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. त्यापूर्वी 15 मार्चला महाविकास आघाडीचा एक मेळावा सुद्धा पार पडणार आहे.
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आणि शिंदे फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा मास्टर प्लॅन आखला आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज विधिमंडळात अजित पवार यांच्या दालनात उद्धव ठाकरे, जयंत पाटील, यांच्यासह ,महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, कोकण अशा विविध भागांमध्ये एकूण सहा सभा घेण्याबद्दल चर्चा झाली.
२ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा होणार आहे. त्यांनतर इतर ठिकाणी सभा होतील. नुकतीच खेड येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली होती. त्या सभेला झालेल्या गर्दीमुळे नक्कीच महाविकास आघाडीला बळ मिळालं आहे. राज्यातील ठाकरे सरकार ज्याप्रकारे कोसळले ते पाहता जनतेमध्ये उद्धव ठाकरेंच्याबद्दल प्रचंड सहानभूती आहे. महाविकास आघाडी अशीच एकत्र राहिल्यास भाजप आणि शिंदे गटाचे टेन्शन वाढू शकत हे मात्र नक्की…