सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप- शिंदे गट सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. सध्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा राज्यात सुरु होणार आहेत, तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ नसून ती वज्र “मुत” आहे अशी टीका त्यांनी केली आहे. ते सातारा येथे प्रसामाध्यमांशी बोलत होते.
महेश शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीची वज्र मुठ नसून ती वज्र मुत आहे. त्या मुठीतील अंगठा हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निशाणी आहे कधी आत तर कधी बाहेर, त्यांनी कोणाला ठेंगा दाखवलेलाही कळणार नाही. तर करंगळी हे बोट संजय राऊत यांची निशाणी आहे. थंडीमध्ये आपण त्या बोटाचे संकेत देत असतो. मधले बोट हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. आणि त्यांच्या शेजारील २ बोटे म्हणजे अजित पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले आहेत. त्या दोघांनीही उद्धव साहेबांना दाबून दाबून दाबून काय अवस्था झाली असेल. ते पहा त्यामुळे ही वज्रमुठ नसून ती वज्र “मुत” आहे. त्यामुळे जनता यांना स्वीकारणार नाही असं महेश शिंदे म्हणाले.
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार दमदारपणे चाललं आहे. सर्वसामान्य आणि गोरगरिबांची सेवा करणारे हे सरकार आहे. मागच्या वेळी लोकांनी शिवसेना भाजपच्या ४२ जागा निवडून दिल्या होत्या, मात्र आता ४८ पैकी तब्बल ४५ जागा आमच्या निवडून येतील, तसा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे असेही महेश शिंदे यांनी म्हंटल.