महिंद धरण ओव्हर फ्लो : धरण क्षेत्रात स्टंटबाजी करणाऱ्यावर पोलिसांचा कारवाईचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण अवघ्या दोनच दिवसात ओव्हर फ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून धरणाच्या लाभक्षेत्राची उन्हाळभराची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान धरण क्षेत्रात कुणी पोहोताना तसेच सेल्फी काढताना किंवा जीव धोक्यात घालून स्टंट करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी सांगितले.

ढेबेवाडी पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील वांग नदीवरील महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सकाळपासून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. डोंगरदऱ्यातून नदी- नाले व ओढ्यातून मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच धरण ओव्हर फ्लो झाले. या धरणाने ढेबेवाडी परिसरातील अनेक गावाच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यावर्षी नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या 104 मीटरच्या मुक्तपतन पद्धतीच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणाच्या दगडी सांडव्याची झालेली पडझड काही दिवसापूर्वीच तात्कालीन अधीक्षक अभियंता विजय घोगरे, सुरेन हिरे, संजय बोडके व त्यांचे सहकारी उत्तमराव दाभाडे, योगेश पाडळकर आदींनी महेश पाटील इन्फ्राटेकचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्या विशेष सहकार्याने हे काम अवघ्या 25 दिवसात तडीला नेत धरणाला सुरक्षितता दिली आहे.

सेल्फी काढण्याचा मोह तसेच स्टंट टाळा : राहुल शेडगे

महिंद धरणाच्या सांडव्यावरून पडणारे पाणी पर्यटकांना खुणावत आहे. धरणस्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. धरण परिसरात साचलेल्या शेवाळ्यामुळे निसरडे झालेले दगड तसेच सांडवा यामुळे पाय घसरून दुर्घटना घडू शकते. धरणात गाळही मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. यामुळे धरण स्थळी सेल्फी काढण्याचा किंवा पोहण्याचा मोह युवा वर्ग तसेच नागरिकांनी टाळावा, असे आवाहन महिंद गावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल शेडगे यांनी केले आहे.