सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्हा परिषद सदस्यांना समान निधी वाटप आणि सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून धुसफूसत असतानाच वॉटर एटीएमच्या पाच कोटींच्या टेंडर वरून सांगली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात दोन गटात तुफान राडा झाला. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. बंगल्या मधील साहित्याची तोडफोड करण्यात आली. राड्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पती, दिर यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सदस्यांना समान निधी वाटप आणि सभा ऑफलाईन घेण्याचा वाद धुसफूसत असतानाच सोमवारी रात्री वॉटर एटीएम टेंडर देण्याच्या करणातून तुफान राडा झाला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही मंगळवारी ऑनलाइन घेण्यात येणार होती. या सभेमध्ये वॉटर एटीएम टेंडरचा ठराव करण्यात येणार होता. या टेंडरच्या करणातून सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही सदस्य अध्यक्षांच्या बंगल्यात दाखल झाले. या ठिकाणी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचे दीर आणि पती होते. या दोन गटात टेंडरवरून वाद झाला आणि वादाचे पर्यावसान तोडफोडीत झाले.
या मारहाण प्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे पती नंदू कोरे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेचे भाजपाचे समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, सुनील पवार ( सुनीता पवार पती माहीला बाल कल्याण सभापती भाजप, ) सुनील पाटील ( आशा पाटील पती शिक्षण व आरोग्य सभापती – घोरपडे गट)भाजपाचे अरुण बालटे, अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी दाखल झाले तसेच पाच सदस्यांच्याकडून कोरे यांच्या विरोधातही तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती व दीर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सभापती प्रमोद शेंडगे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाले. अध्यक्षांचे पती व दीर यांनीच आम्हाला मारहाण केली आहे आणि आमच्या विरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप शेंडगे यांनी यावेळी केला.