हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या सहित ४० आमदारांच्या बंडाला आज २० जून रोजी १ वर्ष पूर्ण झालं. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला गेले. आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आल. आज या घटनेला १ वर्ष पूर्ण झालं असून या पार्श्वभूमीवर २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिले आहे.
काय आहे संजय राऊत यांच्या पत्रात –
महोदय, २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून पाळण्यात यावं असं आवाहन करत मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. सर, मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नावाच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतो आणि भारतातील वरिष्ठ सभागृहाचा खासदार आहे. माझा पक्ष शिवसेना (UBT) हा पश्चिम भारतातील एक प्रमुख राज्य असलेल्या महाराष्ट्राचा आहे. शिवसेना या पक्षाची सुरुवात श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये केली होती, ज्यांनी मुंबईतील स्थानिक तरुणांना मदत केली. (पूर्वीची मुंबई)
माझ्या पक्षाचे नेतृत्व आता श्री उद्धव ठाकरे करत आहेत आणि ते 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 20 जून रोजी, भारतीय जनता पक्षाने भडकावल्यानंतर आमच्या शिवसेनेच्या 40 आमदारांचा एक मोठा गट आम्हाला सोडून गेला. त्यातील प्रत्येकाने ५० कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडावे यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली. ज्या ४० आमदारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसले त्यांचे नेतृत्व श्री. एकनाथ शिंदे (जे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत) करत होते. त्यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे आणखी 10 अपक्ष आम्हाला सोडून गेले.
20 जून रोजी एकनाथ शिंदे आणि इतर ५० आमदार मुंबईहून शेजारच्या गुजरात राज्यात गेले आणि इथूनच बंडखोरीला सुरुवात झाली. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली जे खरं तर त्यावेळी आजारी होते. उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर 2021 रोजी दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. याचाच गैरफायदा या प्रत्येक आमदाराने घेतला. त्यामुळे ज्याप्रकारे 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून पाळला जातो त्याप्रमाणे 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन मी तुम्हाला करत आहे. असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हंटल.