रस्त्यांच्या कामात हालगर्जीपणा न करता गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा : खा.श्रीनिवास पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रस्ता हा विकासाचा आरसा असतो. त्यामुळे रस्त्यांची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हायला हवीत. रस्त्यांच्या कामात कुठलाही हालगर्जीपणा करू नये, अशी सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिका-यांना केली.

कराड-चिपळूण व आदर्की-लोणंद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिका-यांसोबत सातारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
खा. श्रीनिवास पाटील यांनी कराड ते चिपळूण व आदर्की ते लोणंद या मार्गाचा आढावा संबधित अधिका-यांकडून घेतला. यावेळी ते म्हणाले, कराड ते चिपळूण मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांमधून तक्रारी होत आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली पाहिजे. त्यासंदर्भातील असणा-या त्रुटी दूर करून मार्गातील आवश्यक सुधारणा कराव्यात. ज्या-ज्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्याला तडे गेले आहेत, त्याठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता अधिक आहेत. त्यामुळे तेथे तातडीने दुरूस्ती करावी.

याशिवाय रस्त्याच्या दरम्यान अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात यावीत. लोणंद ते आदर्की मार्गाच्या सुस्थितीबाबत अधिका-यांनी लक्ष द्यावे. रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जाबाबत कोणत्याही तडजोडी करू नयेत. दरम्यान स्वतः जिल्हाधिकारी राहिलेल्या खा.श्रीनिवास पाटील यांनी रस्त्यांच्या कामातील कमतरता अचूक हेरल्या. कामावर बारकाईने लक्ष देण्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. तर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी केल्या. दोन्ही कामाबाबत आसपासच्या ग्रामस्थांच्या असणा-या तक्रारी सोडविल्या गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सारंग पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, श्रुती नाईक, महेश तागडे, क्षत्रुघ्न काटकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment