मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

मुंबईतील गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईसह उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यातच अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक जण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान झाले असून बचावकार्य सुरु आहे.दुर्घटनेत जखमी झालेल्या 15 जणांना जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यापैकी दोघांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. तर 52 जणांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय अंधेरीच्या कूपर रुग्णालयात 2 जणांना दाखल करण्यात आलं आहे.