पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाव-बहिणींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम भावाने आपल्या चुलत बहिणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
वसंत राघू माळी असं आरोपी भावाचे नाव आहे. तर फासाबाई साळू निसाळ असे मृत पावलेल्या दुर्देवी बहिणीचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेचे पती साळू मारुती निसाळ यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. शेतीच्या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केले, असे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
घटनेच्या दिवशी नेमके काय घडले ?
घटनेच्या दिवशी तळपेवाडी या ठिकाणी मयत महिला फासाबाई निसाळ या शेतामध्ये फरसबीची पेरणी करत होत्या. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या गुरांना पाणी देण्यासाठी शेतापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोठ्यात गेल्या. त्या ठिकाणी त्यांचा आरोपी चुलत भाऊ वसंत माळी हा पहिलाच दबा धरून बसला होता. फासाबाई गोठ्यात शिरताच त्यांचा भाऊ वसंत माळी याने त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि तोंडावर कोयत्याने वार केले. हा हल्ला एवढा भयंकर होता कि फासाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर आरोपीने फासाबाई मेल्याची खात्री केल्यानंतर तो गोठ्यातून जंगलात निघून गेला. तिथे असणाऱ्या ओढ्यात त्याने रक्ताने माखलेला शर्ट अर्धवट धुतला. तसेच खून करण्यासाठी वापरलेला कोयता दगडांच्यामध्ये लपवला. अशा प्रकारे आरोपी वसंत माळी याने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करत आरोपी नराधम भावाला अटक केली आहे. तसेच मावळ पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.