सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
मांढरदेव (ता. वाई) येथील काळुबाई देवस्थान ट्रस्टमधील दानपेटीतून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने 1 लाख 64 हजारांची रोख रक्कम आणि दागिने चोरल्याची बाब उघड झाली होती. या प्रकरणी बँक कर्मचाऱ्यासह एकाला वाई पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून 13 लाख 75 हजारांचे चोरलेले दान पोलिसांनी हस्तगत केलं आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये आणि मांढरदेव गावात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आज मांढरदेव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
राज्यासह परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या काळूबाई मंदिरात दररोज हजारो भाविक येत असतात. जानेवारी महिन्यात या देवीच्या यात्रेसाठी लाखोच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या मंदिरात येणारा प्रत्येक भाविक दानपेटीत श्रध्देने दागदागिने, पैसे दान करत असतो. प्रत्येक महिन्यात ठराविक दिवशी देवस्थान समिती व बॅंक कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही देणगीची मोजदाद केली जाते. परंतु गेल्या आठवड्यात देणगीतील काही रक्कम व वस्तू चोरी करताना बॅंक कर्मचारी सापडला होता. या प्रकारानंतर स्थानिक व भाविकांच्यातून संताप व्यक्त केला जावू लागला आहे.
मंदिरातील देणगीच्या चोरीच्या घटनेत आणखी लोकांचा सहभाग असून आजी-माजी ट्रस्टीच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज मांढरदेव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. संपूर्ण मांढरदेव गाव बंद असल्याने धार्मिक पूजेचे साहित्य असलेली दुकाने व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवली आहेत. संपूर्ण मांढरदेव बंद असल्याने राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. या चोरीच्या घटनेत आणखी लोकांचा समावेश असून त्यांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.