कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 21 व 22 मार्च रोजी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा भव्य दिव्य साजरा करु. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.
हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाला पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी भेट देवून सोहळ्याच्या नियोजनाबाबत आज बैठक घेतली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पालकमंत्री ]पाटील पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या सोहळ्याबाबत चर्चा होवून मान्यता दिली. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठक घेवून राज्याचा कार्यक्रम म्हणून या सोहळ्याची सर्व जबाबदारी शासनाने घेतली आहे. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना देशाचे नेते म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या परिषदेच्या माध्यमातून पुढे आणले. त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ही ऐतिहासिक माणगाव परिषद आहे. याच माणगावमध्ये मागासवर्गीय महिला सरपंचाला पद देवून देशाला या गावाने पुरोगामी संदेश दिला आहे. या सोहळ्यासाठी 26 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयात सूचना द्याव्यात, त्यापैकी शक्य असणाऱ्या सूचनांचा समावेश नियोजनात केला जाईल.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.