हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) या उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे यांच्यासोबत ३ माजी नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अश्या बातम्या वेगाने पसरत आहेत . उद्या शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन असून त्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आज उद्धव ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराला स्वतः उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. मात्र मनीषा कायंदे या मात्र नॉट रिचेबल आहेत. राज्यव्यापी शिबिराच्या दिवशीच मनीषा कायंदे यांनी ठाकरेंच्या गटाला रामराम ठोकल्याने ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनीषा कायंदे या खरं तर भाजपमधून शिवसेनेत आल्या होत्या, त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेवर संधीही दिली होती. मात्र आता त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र्र केल्याने खळबळ उडाली आहे.
मनिषा कायंदे या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी आपल्या ५० आमदारांसोबत जेव्हा बंडखोरी केली तेव्हा मनीषा कायंदे यांनी आक्रमकपणे शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. जे जे आमदार खासदार शिंदे गटात गेले त्यांच्यावर त्यांनी तोफ डागली होती. मात्र आता त्याच ठाकरेंची साथ त्यांनी सोडल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, मनीषा कायंदे यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. अशी उडती पाखरे असतात, स्वार्थी लोक असतात, त्यांचा शिवसेनेशी काय संबंध नसतो. ते स्वार्थासाठी येतात आणि स्वार्थासाठी जातात त्यामुळे हा धक्का वगैरे काही नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना इथून पुढे पक्षात जरी संधी दिली तरी जबाबदारीची पदे देऊ नका असं मी उद्धव ठाकरेंना सतत सांगत असतो. असं राऊतांनी म्हंटल आहे.