हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. पावणे अकरा वाजता जालन्यात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर स्वतःच्या हाताने एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना पाणी पाजले आहे. यावेळी, आपण उपोषण मागे घेत असल्याचे मनोज जरांगे यांच्याकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आज जरांगे यांची मनधरणी करण्यात सरकारला यश आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज कोणत्याही शेड्युल नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात दाखल झाले. यानंतर त्यांनी सर्वात प्रथम मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच आज जरांगे आपले उपोषण देखील मागे घेतील असे म्हटले जात होते. अखेर आता या सर्व शक्यता खऱ्या ठरल्या आहेत. 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी पाण्याचा घोट घेऊन उपोषण मागे घेतले आहे. यातूनच आज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख अटी
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी शिष्टमंडळाकडून सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून जीआर काढण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी या जीआरमध्ये काही दुरुस्त्यात सुचवल्या होत्या. तेव्हाच उपोषण मागे घेतले जाईल असे म्हणले होते. त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याचे तयारी दाखवली होती. परंतु त्यावेळी त्यांनी पाच अटी सरकार पुढे मांडल्या होत्या. त्यातील पहिली अट, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची होती. तर दुसऱ्या अटीत त्यांनी म्हटले होते की, उपोषण सोडत्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ हजर असावे. त्यानुसार, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. परंतु यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हजार नव्हते.