हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला. पण, आपण 40 दिवस दिले. सरकारने वेळ मागून घेतल्याने ते कोंडीत आहेत तर आपली कसोटी सुरू आहे. आता मराठा समाज आरक्षणाचे हे पहिले आणि शेवटचे आंदोलन आहे. “आता सरकारला सुट्टी नाय, मराठा समाज सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणारच,” असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडीत काल रात्री झालेल्या सभेतून दिला.
मराठा आरक्षणबाबत जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, त्यांच्या कालच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी या दोन ठिकाणी जरांगे पाटील यांची सभा होणार होती. हि सभा काल पार पडली. या सभेतून जरांगे पाटील यांनी आपली तोफ राज्य सरकारावर डागली. सभेतून त्यांनी थेट राज्य सरकारला इशाराच दिला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/869665774877544
वळवळ न करता आरक्षण द्या…
सर्व निकषात बसूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आरक्षणाचा हा लढा आता आपण ताकदीने लढायचा आहे. पाच हजार पानांचा पुरावा मिळाला असून सरकारनेही वळवळ न करता आरक्षण द्यावे, असे आवाहन मनोज जरांगे जरांगे-पाटील यांनी केले. मराठा क्षत्रीय असून त्याला लढायचं कसं ते माहीत आहे. शेती करुनही मराठा समाज देशाला अन्न पुरवतो. मराठा आणि कुणबी एकच आहेत, असेही जरांगे-पाटलांनी ठणकावून सांगितले.
मराठ्यांनी कधी जात पाहिली नाही
मराठ्यांनी जात न पाहता पक्ष आणि नेते मोठे केल्याचे सांगून जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाची पुन्हा संधी नाही. आताच संधीचे सोने करुया. कारण हा पहिला आणि शेवटचा लढा आहे. आपल्यात फूट पडू न देता आरक्षण मिळवायचे आहे. कारण, सरकारने वेळ मागून घेतल्याने ते कोंडीत आहेत, तर आपली कसोटी सुरू आहे. महाराष्ट्रात उसळलेली ही लाट म्हणजे अनेक पिढ्यांची खदखद आहे.
…तर आरक्षण कुणासाठी मागायचे?
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे चार दिवस आहेत. त्यांनी त्यापूर्वी आरक्षण द्यावे. अन्यथा 22 ऑक्टोबरला आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला. मराठा समाजाला अंधारात ठेऊन नाही तर बरोबर घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. आंदोलन कसे करायचे, याची दिशा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले. मराठा समाजाची टीम तयार करुन गावोगाव जागृती करा. आंदोलन शांततेत करा. जाळपोळ आणि उद्रेक अजिबात करु नका. आरक्षणासाठी आत्महत्या करु नका. तरुणांनी आत्महत्या केली तर आरक्षण कुणासाठी मागायचे, असा सवाल त्यांनी तरूणाईला केला.