हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारी पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. हे उपोषण मागे घेत, “राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. 40 वर्ष दिले अजून थोडा वेळ देऊ” असे जरांगे पाटील यांनी म्हणले आहे.
राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरुवात केली होती. गेल्या नऊ दिवसांपासून जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावत चालली होती. त्यामुळे मनोज जरांगे यांनी हे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती मराठा बांधवांसह राजकिय मंडळींनी केली होती. आज अखेर या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून आणि सरकारला आणखीन मुदत देऊन जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्य म्हणजे, जरांगे पाटलांनी हे उपोषण मागे घेतले असले तरी राज्यातील साखळी आंदोलन सुरूच राहणार आहे.
आज मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 2 जानेवारी पर्यंतची वेळ दिली आहे. यावेळी त्यांनी म्हणले आहे की, आज आम्ही आमचे उपोषण मागे घेत आहोत. परंतु आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही. तुम्ही वेळ घ्या. पण आम्हाला आरक्षण द्या, मात्र आता दिलेला हा वेळ शेवटचाच असेल. आम्ही राज्य सरकारला फक्त 2 जानेवारीपर्यंतची वेळ देत आहोत. तसेच, “मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार तयार आहे. तसं आज ठरलंय. त्यांनी हे मान्य केलंय. हे मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी विशेष सांगतोय” अशी माहिती देखील जरांगे पाटलांनी यावेळी दिली आहे.
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
पुढे बोलताना, “अर्धवट आरक्षणाचा निर्णय झाला असता तर आपला एक भाऊ नाराज झाला असता तर दुसरा खूश झाला असता. दिवाळी सर्वांना गोड झाली पाहिजे. एकाला गोड आणि दुसऱ्याला कडू या मताचा मी नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करा. वेळ घ्यायचं तर घ्या. पण सगळ्या भावांना आरक्षण द्या, असं ठरलं. त्यांनी ते मंजूर केलं. ही समिती महाराष्ट्रभर काम करेल. अहवाल देईल. आम्ही त्यांना सांगितलं ही शेवटची वेळ आहे” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.