कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कराड येथील स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत मनोज माळी, भानुदास डाईनगडे यांच्यावतीने 5 रोजी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे व उपोषणाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उद्या प्रहारच्या कार्यकर्त्यांच्यावतीने कराडात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज माळी यांनी आज दिला आहे.
कराड येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात प्रहार पक्षाच्यावतीने मनोज माळी यांनी उपोषण सुरु केले असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही गेल्या चार दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयातील अनेक गैरसोयी व प्रलंबित मागण्यांबाबत उपोषण सुरु केले आहे. आमच्या काही महत्वाच्या मागण्या आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयात काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ती लवकर भरावीत, नवीन सिटी स्कॅन मशिनही नाही. तसेच अनेक असुविधा आहेत.
यासाठी आम्ही उपोषण सुरु केले आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे आमच्याशी काही संघटनांनी उद्यापासून रास्तारोको आंदोलन करणार आहोत. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा मनोज माळी यांनी दिला आहे.
पालकमंत्री येतात अन चोरून बघून निघून जातात –
जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील दररोज चारवेळा उपोषणस्थळी परिसरातून फेऱ्या मारतात. मात्र, त्यांनी एकदा सुद्धा आमच्याकडे बघितलेले नाही. चोरून बघणार आहे निघून जाणार. त्यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आमची एकच मागणी आहे की, तुम्हाला रुग्णालयातील गैरसोयीचा प्रश्न गंभीर वाटत नाही का? तुम्ही रुग्णालयातील प्रश्नांकडे का दखल घेतली नाही. माझी जर मरणाची वाट आणि पालकमंत्री बघत असतील आणि त्यानंतर ते जर रुग्णालय चांगले करणार असतील तर मी मरायला तयार आहे.