पर्यटन| पाऊस सुरु झाला की लगेचच मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत या पावसाळ्यात कुठे कुठे जायचे याचे आराखडे बांधाले जातात आणि वेगवेगळ्या स्थळांची माहिती गोळा करण्याची लगबग सुरु होते. परंतु तीच तीच ठिकाणं आणि तिकडची गर्दी आठवली की बर्याच जणांचा हिरमोड होतो. म्हणून प्रत्येकाला थोडसं ऑफबीट, वेगळ्या ठिकाणी जायला नक्की आवडेल. महाराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश नितांत सुंदर आहे.महाराष्ट्राला सुंदर सागरी किनारा, अनेक नद्या तसेच सह्याद्री-सातपुडासारख्या डोंगररांगा, जंगल, अभयारण्ये, मंदिरे, गडकिल्ले, इत्यादी ब-याच गोष्टी लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासदेखील लाभला आहे.
मुंबई ते चंद्रपूर आणि सावंतवाडी ते तोरणमाळ या संपूर्ण प्रदेशात पावसाळ्यात जाण्यासाठी बरीच ठिकाण आहेत. पुण्याजवळच असलेली ज्ञानदेवांची आळंदी, तुकोबारायांचा भंडारा डोंगर, देहू, संभाजी महाराजांचे स्मारक असलेले आणि नदी संगमावर वसलेले तुळापूर, तसेच राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, सोनोरी, इत्यादीसारखे बरेच किल्ले आहेत.
त्याचप्रमाणे लोणावळ्याचे भुशी धरण, त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी बरीच लोक जातात पण तेथून जवळच असलेला कोरीगड, तैल बैला, घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे.लोणावळ्याजवळील कार्ला – भाजे लेण्या, लोहगड , विसापूर, राजमाची, तुंग, तिकोना यासारखे किल्लेदेखील एका दिवसात भेट देण्याजोगी ठिकाण आहेत.
तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो आणि हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल द-याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो.याच रस्त्यावर विंझणे गावात विंझाई देवीचे सुंदर मंदिर आहे आणि त्या मागे एक अतिशय चांगले जंगल आहे. हे जंगल निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवनच आहे. येथे विविध प्रकारचे साप, बेडूक, पशु-पक्षी, फुल पाखरे, वनस्पती इत्यादीचा अभ्यास करता येईल.
माळशेज घाटाचे सौंदर्य बर्याचजणांनी अनुभवले असेल पण त्याचबरोबर माळशेजघाटा आधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो.