हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आज खालावली आहे. त्यांना आदोंलन मंडपात सलाइन लावण्यात आली आहे. मात्र तरीदेखील ते आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. “कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही “असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. सध्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे मराठा आंदोलकांची चिंता वाढली आहे. गेल्या 9 दिवसांपासून मनोज जरांगे मराठा समाजाचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारताना दिसत आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारकडून याप्रकरणी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाही.
प्रकृती खालावली असताना आंदोलन सुरू
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा, यासाठी मराठा बांधवांना घेऊन मनोज जरांगे यांनी हे आंदोलन पुकारले आहे. मात्र गेल्या नऊ दिवसांपासून राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्यामुळे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळेच आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आज उपोषणाचा नववा दिवस असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. ज्यामुळे त्यांना आज पहाटेच सलाईन लावण्यात आली आहे. तर डॉक्टरांनी देखील त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. तरी देखील मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु आहे.
आंदोलकांची सरकारला कळकळीची विनंती
मनोज जरांगे यांचे प्रकृती खालावत चालल्यामुळे मराठा आंदोलन देखील चिंतेत पडले आहेत. सर्व मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या भोवती खोळका जमवून बसले आहेत. “मनोज जरांगे प्रकृती खालावत चालली असताना देखील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे सरकारने लवकर मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढावा. आणि मनोज जरांगे यांचा जीव वाचवावा “अशी कळकळीची विनंती मराठा आंदोलकांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे आज अंतरवाली येथे मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे.
नेत्यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
दरम्यान, जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनावेळी झालेल्या लाठीमारामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर विरोधी नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे अनेक राजकीय नेते आंदोलनास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उदयनराजे भोसले, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर अशा अनेक नेत्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. तर “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार लवकर तोडगा काढेल” असे आश्वासन देखील नेत्यांकडून देण्यात आले आहे.