हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच मराठा नेते दिलीप पाटील यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे रात्रीच बीड मधून मुंबईला निघाले. खरं तर बैठकी हि रविवारी दुपारी ४ वाजता आयोजित होती, मात्र मंत्रालयातून दोन वेळा कोणीतरी फोन करून तातडीने मुंबईला या, बैठक १२ वाजता होणार आहे, असे सांगितल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला आहे. जर बैठकीची वेळ बदलली नसती तर मेटे सकाळी निघून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचले असते. मात्र दुपारी १२ ला बैठक ठेवल्याने मेटे रात्रीच मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्यामुळे ही वेळ कोणी बदलली असा सवाल दिलीप पाटील यांनी केला आहे.
तर दुसरीकडे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही मेटेंच्या मृत्यू बाबत शंका व्यक्त केली आहे. राज्यामध्ये सत्तांतर झालं. मात्र, एवढी मोठी घडामोड होऊनही विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी या सर्व प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. याबाबत त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. अचानक काल त्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आलं. कोणी बोलावलं होतं? कशासाठी याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.