मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असावरी जोशी यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. चित्रपटसृष्टी, कलाकार आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं आसावरी जोशी यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे कलाकार, लोककलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या पक्षात प्रवेश केला असे आसावरी जोशी यांनी म्हंटल. “कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेन. माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आलाय, तो मी नक्की पूर्ण करेन. मी एकच ठरवून आलेय की, राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन,” असं वक्तव्य आसावरी यांनी यावेळी केलं.

आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. दरम्यान, लीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी आणि हिंदी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार प्रवेश करत आहेत. सविता मालपेकर, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, वैशाली माडे, सुरेखा पुणेकर, सुरेखा कुडची आणि आता आसावरी जोशी यांसारख्या कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे