मुंबई प्रतिनिधी | मराठी भाषा न शिकवणाऱ्या केंद्रीय बोर्डाच्या व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फैलावर घेतले. कोणत्याही बोर्डाची शाळा असो महाराष्ट्रात त्या शाळेला मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले. मराठी विषय बंधनकारक करण्यासाठी सरकार कठोर कायदा करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देत होते.
‘काही शाळा विशेषत: सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायद्याचं पालन केलं जात नाही, असं लक्षात आलं आहे. हा प्रकार रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात निश्चितपणे बदल करण्यात येतील व अतिशय कडक कायदा तयार केला जाईल. महाराष्ट्रात मराठी शिकणं सर्वच शाळांना बंधनकारक राहील. मग ती कोणत्याही बोर्डाची शाळा असो त्या शाळेला मराठी शिकवावंच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले.