औरंगाबाद – मराठवाड्यातील एकूण धरणांपैकी चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर जायकवाडी धरणात 56 टक्के जलसाठा असून खडका बंधारा शंभर टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला अति मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. यामुळे यावर्षी मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठवाड्यातील सर्व 11 प्रकल्प आणि 2 बंधाऱ्यात 5 हजार 775 दशलक्ष घनमीटर जलसाठ्यांची क्षमता आहे. मागील वर्षी 4 हजार 558 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा विभागात होता. त्यात सध्या 541 दशलक्ष घनमीटर इतकी कमतरता आहे. मराठवाड्यातील निम्न दुधना, माजलगाव, मांजरा, पेनगंगा, निम्न तेरणा हे प्रकल्प 100 टक्क्यांच्या वाटेवर आहेत. प्रकल्पात समाधानकारक पाणी आल्यामुळे मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच जायकवाडी धरणात 1 हजार 201 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. नाशिक कडून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जायकवाडीच्या साठ्यात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मात्र जायकवाडी धरण आजच्या तारखेला तुडूंब भरले होते.
मराठवाड्यातील मोठे प्रकल्प, बंधाऱ्यातील जलसाठा –
जायकवाडी – 56 टक्के
निम्न दुधना – 97 टक्के
येलदरी – 100 टक्के
सिद्धेश्वर – 100 टक्के
माजलगाव – 94 टक्के
मांजरा – 56 टक्के
पेनगंगा – 98 टक्के
मानार – 100 टक्के
निम्न तेरणा – 73 टक्के
विष्णूपुरी – 100 टक्के
सिना कोळेगाव – 21 टक्के
शहागड बंधारा – 46 टक्के
खडका बंधारा – 100 टक्के