औरंगाबाद – आई-वडिलांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. अवघ्या दोन वर्षांतच त्याने रंग दाखविण्यास सुरुवात केली. प्रचंड दारू पिऊन दररोज मारहाण करू लागला. हा जाच सहन होत नसल्यामुळे शेवटी दीड वर्षाच्या मुलाला घेऊन तिला घराबाहेर पडावे लागले. काही दिवस नातेवाइकांकडे काढल्यानंतर शेवटी शहर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाकडे मदतीचा हात मागितला. दामिनी पथकानेही मदतीचा हात देत त्रासलेल्या युवतीची सेजल आधार निकेतन केंद्रात व्यवस्था केली.
वैजापूर तालुक्यातील 24 वर्षीय रुपालीने (नाव बदलले आहे) 2019 मध्ये आई-वडिलांच्या मनाविरुद्ध विवाह केला. यानंतर ती पतीसह शहरातील टाऊन हॉल परिसरात राहू लागली. दीड वर्षांपूर्वी मुलगा झाला. पती कामधंदा करीत नव्हता. त्याला दारूचे व्यसन लागले. तो दारू पिऊन रुपालीला मारहाण करीत असे. त्याच्या त्रासाला रुपालीसह तिच्या सासरचेही कंटाळले. शेवटी तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचाही काही परिणाम झाला नाही. रुपालीने 15 दिवसांपूर्वी दीड वर्षाच्या मुलाला सोबत घेत सासर साेडले. सासर सोडल्यानंतर कोठे जायचे, हा प्रश्न तिच्यापुढे होता. आई-वडिलांच्या मनाविरुद्ध विवाह केलेला असल्यामुळे माहेरीही जाऊ शकत नव्हती. काही दिवस विविध नातेवाइकांकडे राहून शेवटी तिने 26 फेब्रुवारीला सिटी चौक पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी सर्व आपबिती सांगितली. सिटी चौक पोलिसांनी हा प्रकार दामिनी पथकाला कळवला. ‘दामिनी’च्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस नाईक निर्मला निंभोरे यांनी रुपालीची सर्वतोपरी मदत केली.
रुपालीला बनायचे पोलीस –
रुपालीची दामिनी पथकाने सेजल आधार निकेतन केंद्रात व्यवस्था केली आहे. ती ‘दामिनी’चे आभार मानते. जिवाचे काही तरी बरेवाईट करून घेतले असते; पण दीड वर्षांच्या मुलाकडे पाहून हा विचार सोडून आता पोलिसांत भरती व्हायचे असल्याचे तिने सांगितले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक उमाप यांनी तिला स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसह इतर मदतही देण्याची तयारी दाखवली आहे.