मसूरला सशस्त्र दरोडा : डाॅक्टर पतीसह- पत्नीला मारहण, चोरट्यांकडून रोख रक्कमेसह दागिने लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मसूर येथे मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून या दरोड्यात डॉक्टर पती-पत्नीस जबर मारहाण करण्यात आली. या दरोड्यात रोख रक्कमेसह दागिण्यांची चोरी झालेली असून पोलिस घटनास्थळी दाखल झालेले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या दरोड्यामुळे मसूरसह तालुक्यात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डाॅक्टर दांम्पत्यांवर कराड येथे सह्याद्री दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मसूर- शामगाव मार्गावर बुधवारी दि. 2 रोजी पहाटे संतोषीमातानगर येथील नविन गावठाणमध्ये असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. संपत हिराप्पा वारे (वय- मूळ रा. कालगाव, ता. कराड), अनिता संपत बारे (वय – 48) यांच्या बंगल्यात दरोडा पडला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला असून दरोड्यात डाॅ. वारे यांच्यासह त्यांच्या पत्नीस जबर मारहाण करण्यात आली. बंगल्यातील रोख रक्कम व दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल, पोलिस उपविभागीय अधिकारी रणजित पाटील, उंब्रज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी भेट दिली असून श्वानपथकास पाचारण करण्यात आले.

या दरोडेखोरांनी बंगल्यात घूसल्यानंतर बंगल्यातील काही खोल्या बाहेरुन बंद केल्या. तर मुख्य रूममध्ये असणाऱ्या डॉक्टर पती-पत्नी यांना मारहाण करीत रुममधील कपाटे साहित्य अस्ताव्यस्त करीत मोठ्या प्रमाणात दागिने व रोख रक्कम लुटून पोबारा केला आहे. विरोध करणाऱ्या डॉ. पती-पत्नीस जबरी मारहाण केली. गस्त घालणारे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या मारहाणीत डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांना सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.