सरताळेतील शर्यतीच्या बैलाचा हत्यारा आरोपी मेढा पोलिसांनी केला गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळे येथे कुडाळ पाचवड रस्त्यालगत कॅनॉल मार्गावर एका शर्यतीच्या बैलाची हत्या झाल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर मेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासानंतर आता आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. वाई तालुक्यातील कुंभारवाडी असले येथील कुमार प्रकाश पडवळ (वय 28 ) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपीने सहा दिवसांपूर्वीच शर्यतीच्या बैलाला पुणे तालुक्यातील भोर बैल बाजारातून आपल्या स्वतःच्या पिकपमध्ये घेऊन आला. आणल्यानंतर आरोपीने झाडाला बांधून त्याची निर्दयपणे हत्या केली. बैलाची निर्दयपणे हत्या करून कोणालाही यासंदर्भात थांगपत्ता न लागु देता आरोपी पसार झाला. घटना उघडकीस आल्यानंतर अज्ञात इसमाच्या विरोधात मेढा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्गात व सर्वसामान्य व प्राणी प्रेमी यांच्यात संतापाची लाट उसळली होती.

दरम्यान, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी तपासाची सूत्रे गतिमान करत हत्या झाल्यापासून सहा दिवसांच्या आतच आरोपी कुमार प्रकाश पडवळ याला अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली पीकअप (क्रमांक एमएच 11 सीएच 2019) गाडी ताब्यात घेतली आहे. या घटनेच्या तपासात पोलीस उपनिरीक्षक शिंदे, इमरान मेटकरी, नितीन जाधव यांच्यासह मेढा, कुडाळ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.