हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना पुढचे काही दिवस अडचणीचे जाणार आहेत. कारण येत्या 27 नोव्हेंबरपासून मुंबई लोकलसाठी 20 दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन मुंबई लोकल प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या फेऱ्या मोठ्या संख्येने रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 नोव्हेंबर नंतर पुढील 20 दिवसांच्या मेगा ब्लॉक दरम्यान मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्याचे हाल होणार आहेत. यामागील नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात …
लोकल मार्गावर रोज 3- 4 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार:
मुंबई लोकल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व- पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणाच्या कामासाठी मुंबई लोकलसाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे. संपूर्ण 20 दिवसांच्या मेगा ब्लॉकसाठी रेल्वेकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार रोज 3-4 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.काही दिवसात ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे याकाळात चालवण्यात येणाऱ्या सर्व लोकलच्या फेऱ्या रेल्वे रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
पुलासाठी 90 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित :
नवीन उभारण्यात येणाऱ्या गोखले पुलासाठी एकूण 90 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. गोखले पूल हा मुंबई महानगर पालिका व पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. 48 वर्ष जुना असलेला गोखले पूल पाडून त्याजागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येत आहे. नवीन पुलासाठी 25 मीटर उंचीवर गर्डर टाकण्यात येणार आहे. नवीन गर्डर हा साधारण 90 मीटर लांबीचा आहे. गर्डरचे सुटे भाग एकत्र करून त्यांची जोडणी गोखले पुलाजवळ करण्यात येत आहे . गर्डरचे वजन सुमारे 1300 टन असल्याने विशेष क्रेनच्या मदतीने गर्डर उभारण्यात येणार आहे.