औरंगाबाद : शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता 5 एप्रिलपासून मेगा कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. या मोहिमेसाठी शंभर पथके नियुक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दहा ते पंधरा दिवसांत तीन लाख शहरवासीयांचे लसीकरण करण्याचे टार्गेट प्रशासनाने समोर ठेवले आहे.
शहरात मागील पंधरा दिवसांत कोरोना संसर्गाने चांगलाच विळखा घातला आहे. संसर्गाची ही साखळी अशीच वाढत गेल्यास शहरात कोरोना रूग्णवाढीचा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या उपाययोजनांना देखील आता कमी पडताना दिसत आहे.
कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय उरला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे 5 एप्रिलपासून मेगा लसीकरण मोहीम हाती घेण्याचे प्रशासनाने नियोजन आहे. कोरोनाचा संसर्ग राहणारच आहे, त्याच्यासोबतच आपल्याला जगावे लागणार आहे. त्याच्या सोबत जगताना आपली रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहीजे आणि या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण देखील कमीत कमी झाले पाहिजे, यासाठी आता प्रत्येकाने लस घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मेगा लसीकरणावर भर दिला जात आहे.
या मोहिमेसाठी शंभर पथके तयार केली जात आहेत. सरकारने आता सरसकट 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना झाला पाहीजे, या उद्देशाने लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा