औरंगाबाद : शहरातील चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली. तसेच येथील आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट,कोविड वॉर्ड,लॅब इत्यादींची पाहणी करत संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेची पाहणी केली. तसेच परिसरातील सांडपाण्याबाबत कंत्राटदारास सूचना केल्या. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील रूग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून रुग्णालयातील अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी रुग्णांनी या सेंटरमध्ये मिळत असलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले.
रुग्णांशी संवाद साधल्यानंतर सेंटरमधील औषधीसाठा व इतर अनुषंगिक साधनसामुग्रीचीही विचारपूस अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर औषधी साठ्याचा अभिलेख अद्यावत ठेवण्याबाबत सूचना केल्या. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चांगल्या कामाचे कौतुकही चव्हाण यांनी केले. यावेळी मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, भोंबे आदींसह कोविड केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत ऑक्सीजन पुरवठादारांशी चव्हाण यांनी संवाद साधला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांना प्लांट, ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सूचना केल्या. तसेच परिसरातील बायोमेडिकल वेस्टची तत्काळ योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. परिसरात स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. घाटी येथील जुन्या मेडिसिन इमारतीचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी नवीन कोविड केयर सेंटर उभारण्याचे काम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेले आहे.
याठिकाणची पाहणीदेखील चव्हाण यांनी केली. घाटीतील या कोविड केअर सेंटरचे काम लवकरात लवकर व गुणवत्तापूर्ण होण्यावर भर दिला आहे. यापूर्वीच्या वेळी पाहणी करत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी डॉक्टरांना एलबो जॉईंटने सुरू करता येईल अश्या नळाची सुविधा, बाथरूममध्ये एक्झॉस्टेड फॅन आणि बाथरूम पॉटची सुविधा तातडीने करून यासाठी लागणारे साहित्य दर्जेदार गुणवत्तेचे वापरण्याच्या सूचना करून गुणवत्तेसोबत ताडजोड न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. आजही प्रत्यक्ष भेट देऊन कोविड केअर सेंटरमध्ये गुणवत्तापूर्ण साधनसामुग्री वापरण्याबाबत आणि एक्झॉस्टेड फॅन बदलून मॉडिक्युलेट एक्झॉस्टेड फॅन बसवण्याच्या सूचना त्यांनी अभियंत्यांना केल्या.