पंतप्रधान मोदींची तरुणांना मोठी भेट! “मेरा युवा भारत पोर्टल” केले लॉन्च; याचे उद्दिष्ट काय असेल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर तरुणांना एक मोठी भेट दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी खास मेरा युवा भारत पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील प्रत्येक युवकाला एका मंचावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, मेरा युवा भारत पोर्टलवरून तरुणांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील. थोडक्यात, हे पोर्टल देशातील तरुणांचे प्रतिनिधित्व करेल.

31 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्यूअली मेरा युवा भारत पोर्टलचे लॉन्चिंग केले आहे. याबाबची माहिती देताना रविवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मेरा युवा भारत’ भारतातील तरुणांना विविध राष्ट्र निर्माण कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल. विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे”

जर तुम्हाला मेरा युवा भारत पोर्टलद्वारे राष्ट्र उभारणीत सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी मेरा युवा भारत पोर्टलवर अधिकृत नोंदणी करावी लागेल. परंतु फक्त 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुण नागरिक मेरा भारत युवा पोर्टलवर अर्ज करण्यास पात्र असतील. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची देखील आवश्यकता लागेल. या संदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
खरे तर, मेरा युवा भारत पोर्टल हे देशातील तरुणांना राष्ट्र उभारणीशी संबंधित विविध योजनांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची संधी देईल. तसेच, या पोर्टलच्या माध्यमातून तरुणांसाठी विविध उपक्रम राबवले जातील.

पोर्टलचे उद्दिष्ट

मेरा युवा भारत पोर्टल सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, देशातील तरुणांना राष्ट्र उभारणीत भागीदार बनवणे आणि विकसित भारतासाठी युवा शक्ती एकत्र करणे आहे. जेणेकरून अधिकाधिक तरुणांना विविध योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळेल. या पोर्टलच्या माध्यमातून तरुणांना केवळ त्यांच्यातील क्षमता दाखविण्याची संधी मिळणार नाही तर राष्ट्र उभारणीत भागीदार बनण्याचीही संधी मिळेल. या पोर्टलमुळे तरुणांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होणार आहे.