लोणंदला कांद्याच्या भावावरून व्यापारी- शेतकऱ्यांच्यात हमरीतुमरी, काही काळ लिलाव बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणंद | कांद्याच्या भावावरून लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलावा दरम्यान शेतकरी आणि व्यापारी यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यामुळे कांद्याचे लिलाव दीड ते दोन तास बंद पडले होते. बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ आणि लोणंद पोलिसांनी मध्यस्थी करत व्यापारी व शेतकरी यांचा समेट घडवून आणल्याने कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरू झाले.

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजारासाठी 12 हजार 500 कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली होती. लिलावा दरम्यान कांद्याचे भावही 2300 ते 3010 रुपयांपर्यंत तेजीत निघाले होते. मात्र रात्री पाऊस सुरु बाजारात विक्रीसाठी आलेल्या सर्व कांद्याचे लिलाव होवू शकले नाहीत म्हणून दि. 5 रोजी उरलेल्या कांद्याचे लिलाव सुरू असताना कांद्याचे भाव कालच्या पेक्षा 200 ते 250 रुपयांनी कमी निघत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर उपस्थीत काही शेतकऱ्यांनी कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी व्यापारी व शेतकरी यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यामुळे लिलाव बंद पडले.

काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आक्रमक पवित्रा घेतलेल्या काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी बाहेर पाठवण्यासाठी भरलेले कांद्याचे ट्रक आडवण्याचाही प्रयत्नही काही शेतकऱ्यांनी केला. बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी तातडीने याबाबत सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांना सांगून लोणंद पोलिसांनाही याबाबत कळवले. त्यावेळी उपसभापती दत्तात्रय बिचुकले,लोणंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक गणेश माने व त्यांचे सहकारी यांनी त्वरीत बाजार समितीत येवून व्यापारी व शेतकरी यांच्यात चर्चेद्वारे समेट घडवून आणत दीड तासांनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले.

तर उपसभापती दत्तात्रय बिचुकले व सचिव विठ्ठल सपकाळ म्हणाले, कांद्याच्या दर्जा नुसार भाव निघत आहेत. नासलेल्या कांद्याला कसा चांगला भाव मिळेल, दर्जेदार कांद्याला चांगला भाव मिळत आहे. कोणावरही अन्याय होत नाही किंवा होवून दिला जाणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी कांदा चांगला वाळवून व प्रतवारी करूनच बाजारात विक्रीसाठी आणावा. असे आवहानही बाजार समितीने केले आहे.

Leave a Comment