सातारा जिल्ह्याला पुढील 4 दिवस हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस (दि. 11 सप्टेंबर पर्यंत) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे.

जिल्ह्यात दि. 11 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी
पाऊस पडतेवेळी झाडाखाली थांबू नये. ओढे नाले नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. महत्त्वाचे काम नसल्यास अतिवृष्टी कालावधीत घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश ः- पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.