हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार घरांची सोडत (MHADA Home Pune) निघणार आहे. सोडतीची जाहिरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या सोडतीमुळे अनेकांचे पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पुर्ण होईल. नुकताच, मुंबईतील म्हाडाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, मुंबईनंतर पुणे, नागपूर, कोकण येथील म्हाडाच्या घराची सोडत देखील लवकरच काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
25 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु- (MHADA Home Pune)
म्हाडा मंडळाने पुण्यातील पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २५ ऑगस्ट रोजी मंडळाकडून पुण्यातील घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच 25 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश करण्यात येणार आहे. पुण्यानंतर काही कालावधीमध्येच सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांची सोडत देखील निघणार आहे. याबाबतची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यात नोकरीसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यातील घरांची मागणी देखील वाढताना दिसत आहे. यामध्ये पुण्यातील अनेक स्थायिक नागरिक म्हाडाच्या सोडतीची वाट पाहत होते. आता अशा लोकांसाठीच म्हाडाने (MHADA Home Pune) पुण्यातील पाच हजार घरांची सोडत काढली आहे. यापूर्वी देखील म्हाडाकडून पुण्यातील घरांची 2022 मध्ये सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी अनेक नागरिकांनी या सोडतीसाठी अर्ज भरला होता. आता पुन्हा एकदा म्हाडाने सोडत काढल्यामुळे पुणेकरांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे.
मुंबईत 4082 घरांसाठी सोडत
काही दिवसांपूर्वीच म्हाडाने मुंबईतील 4082 घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीसाठी तब्बल 1 लाख 20 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. मुख्य म्हणजे, म्हाडाचा या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील 1947 घरांचा समावेश होता. या घरांसाठी तब्बल 22 हजार 472 अर्ज करण्यात आले होते. या सोडतीचा निकाल 14 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता लागला. त्यामुळे आता इतर भागातील घरांची देखील सोडत कधी निघेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.