शहरातील चिस्तिया कॉलनी परिसरात मध्यरात्री राडा; नगरसेवकासह सात जखमी

औरंगाबाद – शहरातील सिडको एन-6 भागातील चिस्तिया कॉलनी येथे अवैध बांधकामावरून बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी यांच्या भावासह दोन जण जखमी झाले. विरोधी गटाचे नासीर पटेल आणि अन्य चार जण जखमी झाले. तर दुसर्‍या घटनेत जुना मोंढा भागात होळीच्या निमित्ताने आयोजित जेवणाच्या कार्यक्रमात मान पाण्यावरुन वाद अधिक विकोपाला गेला.

चिस्तिया कॉलनीत नासिर पटेल आणि आजू नाईकवाडी यांच्यात मागील काही दिवसांपासून गच्चीवरील अवैध बांधकामावरून वाद सुरू होता. रात्री बारा वाजेच्या सुमारास वाद वाढत गेला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. विटा, चाकू, दगड, दांड्याने मारहाण करण्यात आली. नाईकवाडी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाईकवाडी यांच्या भावाचे प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पटेल यांच्याकडील जखमींना घाटीत दाखल केले आहे.

तसेच जुना मोंढा भागातील रोहिदास पुरा येथे भगत यांच्या घरासमोर होळीनिमित्त देवीच्या पूजेचा कार्यक्रम होता. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. त्यामध्ये मानपान देण्याच्या व जुना भांडणाच्या कारणावरून चौधरी कुटुंब व भगत कुटुंब यांच्यात वाद होऊन एकमेकांच्या विरोधात दगडफेक झाली. दोन्ही बाजूंच्या आठ ते दहा जण जखमी झाले त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.