हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्रात ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर या चित्रपटावरून हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्रात ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करत आहेत. आम्हीही महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सिनेमा काढला. तो कधी टॅक्स-फ्री केला नाही. आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही, असे राऊत यांनी म्हंटले.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी राऊत म्हणाले की, मी कोणाची वकिली केली नाही. आम्ही अनेक वेळा अमन आणि शांतीसाठी काश्मीरमध्ये गेलो. आम्ही टुरिस्ट म्हणून गेलो नाही. खरे तर बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरसाठी जे केले ते कोणीच केले नाही. सध्या महाराष्ट्रात सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट टॅक्स-फ्री कराव अशी मागणी भाजप करत आहे. त्यांना आज काश्मीर आठवले काय? मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते.
दरम्यान काल ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधानसभेत भाजपची कोंडी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण देशालाच लागू होईल. अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.