सातारा | पाटण तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व संभाव्य अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी तालुक्यातील 5 गावातील 80 कुटुंबातील 310 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, सध्या पाटण तालुक्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गतवर्षीचा नैसर्गिक आपत्तीचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने यावेळी सुरुवातीपासूनच खबरदारी व उपायोजनांसाठी पूर्वतयारी केली आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आल्या आहे. खबरदारी म्हणून तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथील पाच कुटुंबातील 18 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा जोतिबाचीवाडी व काहींना नातेवाईकांकडे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
खुडपुलेवाडी येथील 11 कुटुंबातील 74 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा खुडपुलेवाडी, मोरगिरी येथील सहा कुटुंबातील 322 नागरिकांना नातेवाईकांकडे, जितकरवाडी (जिंती) येथील 26 कुटुंबातील 58 नागरिकांना विजय कांबळे हायस्कूल जिंती येथे तर म्हारवंड येथील 32 कुटुंबातील 128 नागरिकांना शासकीय निवारा शेडमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम आहे.