हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी सरकारकडून ‘मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना’ (Mini Tractor Loan Scheme) राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत.
शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार
राज्यातील अनेक लहान शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्यामुळे त्यांना अधिक श्रम व वेळ द्यावा लागतो. परिणामी उत्पादन खर्च वाढतो आणि नफा कमी होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने 2017 च्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा वापर वाढवणे, कमी श्रमात अधिक उत्पादन मिळवणे आणि शेतीतील प्रक्रिया सुलभ करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
अनुदानाचा लाभ आणि आर्थिक मदत
या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांसाठी एकूण 3,50,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी सरकार शेतकरी बचत गटांना 3,15,000 रुपये अनुदान म्हणून थेट बँक खात्यात जमा करणार आहे. लाभार्थी बचत गटाला फक्त 35,000 रुपये स्वतःच्या वाट्याने भरावे लागतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून इच्छुक शेतकरी बचत गटांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच अर्जाची प्रिंट घेऊन ती संबंधित समाज कल्याण कार्यालयात सादर करावी. पात्र अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.
नियम आणि अटी
अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा तसेच तो अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील बचत गटाचा सदस्य असणे आवश्यक आहे. बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे गरजेचे आहे. गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. अनुदान मंजूर झाल्यानंतरच ट्रॅक्टर खरेदीला परवानगी दिली जाईल.