सांगली । काही डॉक्टर उपचारात हेळसांड करीत रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. भरमसाठ बिले करीत आहेत. माझ्याकडे तशा काही तक्रारी आल्याने मी डॉक्टरांचे उपचार व बिलांचे ऑडीट करण्याबाबत बोललो आणि तशी व्यवस्था उभा केली. कोविडच्या या संकटकाळात कोण चुकीचे वागत असेल तर खपवून घेणार नाही. आम्ही जनतेच्या बाजूने ठाम उभा राहू. असा विश्र्वास राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा मांडत, शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाच्या या संकटकाळात बहुतेक डॉक्टर चांगली सेवा देत आहेत. मात्र काही थोडे डॉक्टर उपचारात हेळसांड व भरमसाठ बिले करीत आहेत. अशा डॉक्टरांना कोणी तरी विचारायला नको का? असा सवाल त्यांनी केला. जयंत पाटील म्हणाले, जिथे सरकारी व्यवस्था आहे, तिथे गोरगरीब, सामान्य कुटुंबातील रुग्णांना प्राधान्य द्या अशा सूचना दिल्या आहेत.
कॉलसेंटरच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशन करणे, लोकांचे प्रबोधन, जनजागृती करण्यावर आमचा भर राहील. राज्याच्या ज्या भागात कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या भागात सरकारच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी आठवड्यातून किमान एकदा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलून तेथील प्रश्र्न घ्यायला हवेत. अशी मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. कोविडशी लढताना नव-नवे प्रश्र्न समोर येत आहेत. ते सोडवित पुढे जायला हवे असे त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’