‘जालना ते खामगाव रेल्वेसाठी विचार करू’- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

औरंगाबाद | जालन्यात साडेचार कोटी रुपये खर्चाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनची व्हायबेलेटी तपासून मार्गी लावण्यास सोबतच नांदेड ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्यात आपले प्राधान्य राहील अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी आयोजित कार्यक्रमात केली.

‘रेल्वेला सर्वात मोठे उत्पन्न हे मालवाहतूकीतून मिळते.परंतु गेल्या काही वर्षात हे उत्पादन घटले असून ही वाहतूक 80 टक्क्यांवरून तीस टक्क्यावर येऊन पोहोचली आहे. रेल्वेला 36 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला होता. प्रवासी तिकिटांची भाडेवाढ न करता रेल्वे खाते चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रेल्वेचे तिकीट एक रुपया असेल तर त्यात 48 पैसे नुकसान होते. हे नुकसान सरकार सहन करत असल्याचे’ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ‘जालना ते खामगाव, जालना ते सोलापूर हा मार्गही असून त्यासाठी व्हायबायलेटी तपासण्यात येणार आहे जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचा अहवाल पुढील महिन्यात नव्याने मागविण्यात येणार असून या संदर्भात रेल्वे संघर्ष समिती कडून पाठपुरावा करण्यात आला आहे.’ असेही दानवे यांनी सांगितले.

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरु झाल्यास गतीने प्रवास शक्य होईल. येत्या महिन्यात यामार्गाचा डीपीआर रेल्वे विभागाने तयार करण्याचे निर्देश देत रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुंबई-दिल्ली कॅरिडोरला महत्व देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून उभारण्यात येणाऱ्या रेल्वेमार्गावरून फक्त मालवाहतूक केली जाणार आहे. पूर्वोत्तर राज्यांसाठीही असाच कॅरिडॉर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांचे मत मांडले. टोपे यांनी रेल्वेच्या प्रस्तावासाठी राज्य सरकारची हवी ती मदत केली जाईल असे सांगितले आहे. यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भूपेंद्रसिंह, आमदार नारायण मुचे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, सदस्य राजेश राऊत यांची उपस्थिती होती.

You might also like