सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईचा आढावा दर तीन महिन्याला घेणार आहे. त्यामुळे मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
मुंबई येथे मंत्रालयात मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखालील राज्यातील अवैध मद्य विक्रीवरील कारवाई व उपाययोजना याबाबत आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले की, अवैध मद्य विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, एमपीडीए कायद्यांतर्गत सक्त कारवाई करण्यात यावी. सर्व बाबी तपासून बनावट मद्यनिर्मिती आणि अवैध दारूविक्री यांवर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिकाऱ्यांनी करावा.
आगामी काळात लवकरच ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग यंत्रणा विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती होत असेल तेथील अधिकाऱ्यास याबाबत जबाबदार धरले जाईल. तसेच कायद्याचा जरब बसविणारी कारवाई अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश मंत्री देसाई यांनी यावेळी दिले.