सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्य 1 हजार 1 टक्के खोटं आहे. त्यांनी दोन दिवसांमध्ये हे वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी राऊतांना दोन दिवसांचा वेळ देत आहे. माझे सुरतला गेल्यापासून ठाकरे परिवारावर अर्धा सेकंदही बोलणं झालं नाही, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटातील २२ आमदार आणि ९ खासदार संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावर मंत्री देसाईंनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. ‘खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे, असे केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे. राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,’ असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. गेल्यावर्षी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उध्दव ठाकरे परिवारासोबत अर्धा सेकंदही माझे बोलणे झालेले नाही. तसेच कोणा त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही, असे डिसाई यांनी स्पष्टपणे सांगितले.
विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?
विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एक दावा केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवेला आहे की आमची इथं गळचेपी होते. त्यानंतर गजानन कीर्तीकर यांच वक्तव्य.. बाकीचे तानाजी सावंत आंकाडतांडवानं बोलतात, तानाजी सावंताना बजेटचं मिळत नाही… त्यामुळं म्हणतात आगीतून फुफाट्यात पडलेलो आहे. शिंदे गटातील लोकांचा असंतोष एवढा उफाळून आलेला आहे. आमच्याकडे अनेक यामध्ये मंत्री असलेल्या लोकांनी सुद्धा उद्धव साहेबांकडे संपर्क साधायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी 22 आमदार आणि 9 खासदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.