हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ करायचा याचा विचार सुरू आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा का याबाबत विचार सुरु आहे. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.