बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आरोपी तरुण हा मागच्या काही दिवसांपासून पीडितेच्या घरी येऊन सातत्याने तिला उचलून नेण्याची धमकी आणि शिवीगाळ करत होता. यामुळे या सगळ्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
काय आहे प्रकरण
हि घटना बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील जयरामनाईक तांडा या ठिकाणाची आहे. या गावातील अरुण बाबासाहेब चव्हाण हा तरुण मागच्या १ वर्षांपासून पीडित मुलीचा पाठलाग करत होता. तो नेहमीच पीडितेच्या घरासमोरून चकरा मारत असायचा. ‘मला तू फार आवडतेस, मला तुझ्यासोबतचं लग्न करायचं आहे, असे म्हणत आरोपी तिला सतत त्रास देत होता. एवढेच नाहीतर आरोपी अरुणचे वडील आणि त्याचा भाऊ किरण यांनीसुद्धा पीडितेच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना धमकी दिली होती. ‘तुमच्या मुलीचे आमच्या अरुणसोबत लग्न लावून द्या, नाहीतर तिला आम्ही पळवून नेऊ आणि तुम्हाला जीवे मारू’ अशी धमकीही आरोपींनी पीडितेच्या वडिलांना दिली होती.
यामुळे आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने 29 मे रोजी संध्याकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी गेवराई पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. अरुण बाबासाहेब चव्हाण, बाबासाहेब देवू चव्हाण, किरण बाबासाहेब चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. यामुळे पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींवर विनयभंगासोबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी सध्या फरार असून गेवराई पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.