कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील
राज्यातील पंचायत समित्या अधिक सक्षम करण्यासाठी यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा मानस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. पोलीस परेड ग्राऊंड येथे क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनावेळी हसन मुश्रीफ, अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, खासदास धैर्यशिल माने, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील आदी जण उपस्थित होते.
पंचायत राज व्यवस्था अधिक मजबूत आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने ग्राम विकास विभागाचे काम सुरु असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ”पंचायत राज व्यवस्थेने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावर अधिकाराचे विकेंद्रीकरण झाले असून या व्यवस्थेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची संधी गाव पातळीपर्यंत मिळाली आहे. १५व्या वित्त आयोगात पंचायत समित्यांनाही अधिकचा निधी देवून त्यांना काही अधिकार देण्याचा शासनाचा मानस असल्याचे” त्यांनी यावेळी सांगितलं.
कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यातील एक आदर्श व अग्रेसर जिल्हा परिषद बनविण्याचा आपला मानस असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावा गावात विकास कामे करुन गावे विकासाद्वारे अधिक समृध्द आणि स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही योगदान गरजेचे आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत ही भुमिका जोपासून जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक पारदर्शी आणि लोकाभिमुख करावे. विकास कामामध्ये कसलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तीन दिवसाच्या या क्रीडा स्पर्धामध्ये खेळाडूंनी खिलाडू वृत्ती जोपासून आपले नैपुन्य विकसित आणि वृंध्दीगत करावे, असे आवाहनही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.