औरंगाबाद – महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. यास व्यापारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंत्री संदीपान भुमरे स्वतः बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने पूर्णतः बंद ठेवली आहेत.
शहरात या उलट चित्र दिसत आहे. शहरातील निराला बाजार, कॅनॉट प्लेस, गुलमंडी या भागातील दुकाने सकाळी ११ वाजेच्या नंतरच उघडत असल्याने सध्या प्रतिसादाबद्दल भाष्य करता येत नसले तरी हॅलो महाराष्ट्रच्या टीमने काही व्यापाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी ‘दुकाना उघडणार’ असल्याची माहिती दिली. तर शहरातील जाधववाडी मंडईत तुफान गर्दी असल्याचे दिसून आले. तसेच औरंगपुरा भागात रस्त्यांवर नेहमीसारखीच वाहनांची वर्दळ दिसत आहे. शहरबसेस देखील नियमित धावत आहेत, रिक्षादेखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धावत आहेत.
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबरला तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.