हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्य त्रास देत असल्याचं सांगितलं. त्यांच्या आत्महत्येनंतर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे कलाकारांना त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच आहे, असा इशाराच मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर मनसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन खोपकर यांनी केले आहे.
राजू सापते यांनी व्हिडिओ मध्ये काय म्हंटल-
आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. त्यामुळं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असं कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्येपुर्वी म्हटलं होतं.