Saturday, February 4, 2023

पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? ; मनसेचा राज्य सरकारला संतप्त सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यात मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मनसेनेही उडी मारली आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?; असा सवाल उपस्थित करून मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच कोरोना काय मंदिरातच होतो काय ?? असा सवालही त्यांनी केलाय.

यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर मंदिराच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?, असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे. राज्यात बार उघडले. बारची वेळही ठरवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सलाही परवानगी दिली. कोरोना काय फक्त मंदिरातच होतो काय? काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

देशभरात गुटखा बंदी करा

केंद्र सरकारने गुटखा निर्मिती आणि विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी, अशी मागणी करतानाच महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहेच. परंतु तरीही राज्यात चोरट्या मार्गाने दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांनी गुटखा येत असून त्याला पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुटखा सेवन करून काही लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतात. इतरांच्या आरोग्यासाठी हे घातक असल्यानेच देशभरातही गुटखा विक्रीवर बंदी आणा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’