मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही, इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय. याची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“शेतकरी आंदोलन फार चिघळलं आहे. हे आंदोलन इतकं चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असू शकतात. परंतु केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्य सरकारशी चर्चा करुन या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यात एक कृषी खातं आहे आणि प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करुन केंद्राने या गोष्टींचा निर्णय घ्यायला हवा होता. हे प्रकरण इतकं चिघळण्याची आवश्यकता नव्हती,” असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.
“मी चायना किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरही इतका बंदोबस्त पाहिला नाहीये जितका शेतकऱ्यांसाठी केलाय. इतका बंदोबस्त करण्याची आवश्यकता नाहीये. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. ताणत ताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? 26 जानेवारी रोजी झालेली एक घटना काय घेऊन बसलाय?” असा उपरोधक सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.